आभास हे भाग २ – Marathi Horror Story, Bhaykatha

आभास हे भाग १

Abhas He – Marathi Horror, Suspense & Thriller Story

काही दिवस असेच निघून गेले. सगळं व्यवस्थित चाललं होतं , इशिकाही तो प्रसंग आता ब-यापैकी विसरली होती. एक दिवस अचानक इशिकाच्या बाबांना गावावरून फोन आला, तिच्या आई-बाबा दोघांनाही २-३ दिवसांसाठी गावी जावे लागणार होते. तिच्या बाबांनी तिच्या आईलाही तसं सांगितल्यावर, तिच्या आईला इशिकाची काळजी वाटू लागली. “आई-बाबा तुम्ही नका काळजी करू…तुम्ही जा गावी… मी काळजी घेईन तिची आणि २-३ दिवसांचाच तर प्रश्न आहे ना… शिवाय तिची मैत्रीण सुमनही आहेच की” इशिकाच्या मोठ्या भावाने आई-बाबांची समजूत घातली. मग हो-नाही करत ते गावी निघून गेले. इकडे दुस-या दिवशी रात्रीचे किमान १०.३० वाजले होते. इशिका असंच नेहमीप्रमाणे पुस्तक वाचत बसली होती, तिचा भाऊ बाहेर हॉलमधे कम्प्युटरवर काही काम करत बसला होता. इकडे इशिका पुस्तक वाचण्यात मग्न होती इतक्यात तिला जाणवलं कि तिच्या कानांजवळ कुणीतरी जोरजोरात श्वास घेतंय, त्या श्वासांची गरम उबही तिला मानेवर जाणवत होती. तिने झटकन मागे वळून पाहिलं पण तिथे कुणीच न्हवतं. ती पुन्हा पुस्तक वाचू लागली तर पुन्हा तिला हमसून हमसून रडण्याचा आवाज आला. इशिकाने पुन्हा घाबरून आजूबाजूला पाहिलं तर समोर तिला एक आकृती आकार घेताना दिसली, ती मुलगी गुडघ्यात तोंड लपवून रडत होती, हळूहळू तिचं रडणं आता बीभत्स वाटू लागलं. इशिका थरथर कापू लागली, तिला दरदरून घाम फुटला. इतक्यात अचानक रूममधल्या लाईटस् , चालू-बंद व्हायला सुरवात झाली त्यामुळे इशिका आणखीनच भांबावली. तिला उठून बाहेर पळून जायचं होतं , पण तिला तिथून हलताही येत न्हवतं. मग तिने पुन्हा घाबरून समोर पाहिलं तर त्या मुलीने हळूहळू स्वत:ची मान वर केली अन् इशिकाला तिचा चिरा पडलेला व रक्ताळलेला चेहरा दिसला. ती मुलगी आता रडता रडता अचानक जोरजोरात हसू लागली, तशी इशिका जोरात किंचाळली. तिचा भाऊ धावतंच तिच्या रूममधे आला. “इशु काय झालं …. का ओरडलीस ..इशु!! .. अगं शोना बोल काहीतरी.” तिचा भाऊ तिला सावरत म्हणाला. इशिकाने हळूच समोर बोट करून इशारा केला तर त्याने पाहिले कि समोर आरश्यात ते दोघेच दिसत होते. “इशु कुणी नाहीये तिथे, फक्त आरसा तर आहे तिथे …बघ जरा.” तो म्हणाला “नाही रे दादा… आता तित.. तिथे एक मुलगी बसून रडत होती… तिच्या संपूर्ण चेह-यावर रक्त होतं… मग ती हसायला लागली … दादा ” इशिका भेदरलेल्या आवाजात त्याला सांगत होती. “अगं पण तिथे कुणीच नाहिये.. हे बघ तू इथे एकटी बसली होतीस कि नाही … त्यामुळे कदाचित तुला भास झाला असेल…. चल शांतपणे झोप आता.. रात्रही खुप झालीय..उगाच जागरण नको करूस” तिचा भाऊ म्हणाला. मग त्याने तिला झोपवलं व तिच्या डोक्यावरून हाथ फिरवू लागला. “दादा.. तू इथेच बस माझ्याजवळ … जाऊ नकोस कुठे” इशिका त्याचा हाथ धरत म्हणाली. “हो गं ..नाही जात मी कुठे ..इथेच आहे मी बघ” तिचा भाऊ तिच्या डोक्यावरून हाथ फिरवत म्हणाला. डोळे मिटलेल्या पण घाबरलेल्या इशिकाकडे पाहून अचानक त्याच्याही डोळ्यात टचकन पाणी आले. आई-बाबांना उगाच तिकडे टेंन्शन येईल म्हणून त्याने आई-बाबांनाही यातले काहीच सांगितले नाही. पण वरवर दिसणारा हा प्रकार किती गूढ आणि भयानक होता, याची कुणालाच तिळमात्र कल्पना न्हवती. पुन्हा सर्वकाही सुरळीत झाले. नाही म्हटले तरी इशिका आता पहिल्यापेक्षाही जास्त गप्प गप्प व एकटी राहू लागली. तिच्या या वागण्याने तिच्या कुटुंबाला आता तिची जास्तच काळजी वाटू लागली. पण काही दिवसांनी पुन्हा अशीच एक घटना घडली ज्यामुळे इशिका पुन्हा भितीच्या गर्तेत अडकली. संध्याकाळी कॉलेजवरून घरी येताना वाटेत तिला एक विरळ रहदारी असणारा रस्ता लागायचा, तिथून येताना नेहमी तिच्याबरोबर तिची मैत्रीण सुमन असायची, पण आज तीही इशिकाबरोबर न्हवती. त्यामुळे आज तिचा भाऊ तिला बाईक घेउन न्यायला येणार होता पण त्याला उशीर झाल्यामुळे इशिका एकटीच निघाली होती. हळूहळू अंधारही पडू लागला होता, अचानक तिला तिथे एका घरातून भांडण्याचे व रडण्याचे आवाज येऊ लागले. तिला आश्चर्य वाटलं कि जर या ठिकाणी हे घर होतं तर मग याआधी तिला कधीच कसं दिसलं नाही. पण तरीही तिने तिथे काय चाललंय हे बघण्याचा निर्णय घेतला. ती हळूहळू दबकत त्या घराजवळ गेली तसे घरातले आवाज थांबले. ती हळूच त्या घराच्या खिडकीतून डोकावली तर आत संपुर्ण अंधारच अंधार होता, तिथे कुणीच न्हवतं. अचानक तिच्या खांद्यावर कुणीतरी हाथ ठेवला, तसं तिने घाबरून झटकन मागे वळून पाहिलं तर समोर एक पांढरीफट्ट बाई उभी होती. तिचं डोकं फुटून त्यातून रक्त येत होतं व तेच रक्त तिच्या संपूर्ण साडीवर ओघळत होतं, त्या बाईने इशिकाचा गळा दाबण्यासाठी हाथ पुढे केले, हे पाहून तर आता इशिकाचाच चेहरा पांढराफट्ट पडला. व ती जोरात किंचाळून तिथेच बेशुद्ध पडली. काही वेळातच तिचा भाऊ तिला नेण्यासाठी म्हणून त्याच रस्त्याने येत असताना.. त्याला रस्त्याच्या कडेला कुणीतरी पडलेलं दिसलं त्याने बाईकच्या हेडलाईटच्या प्रकाशात नीट पाहिलं तर इशिका तिथे बेशुद्ध पडलेली दिसली.. त्याने लागलीच बाईकवरून उतरून तिच्या बॅगेतली पाण्याची बाटली काढली व थोडं पाणी तिच्या तिच्या चेह-यावर शिंपडलं तशी इशिका हळूहळू शुद्धीवर येउ लागली. मग त्याने तिला पाणी पाजलं. तिला थोडी तरतरी येताच ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली तसं त्याने तिला शांत केलं व घरी घेउन गेला. इशिकाला घरी आणल्यानंतर सहाजिकच घडला प्रकार सर्वांनाच कळला. आता मात्र इशिकाबरोबर घडणा-या या घटना घरात सर्वांच्याच चिंतेचा विषय बनला होता. इशिकाच्या आईला हा सगळा अमानवीय प्रकार वाटत होता तर तिच्या वडिलांना या असल्या गोष्टींवर विश्वास न्हवता. त्यामुळे त्यांना शांत बसण्याशिवाय पर्यायच न्हवता पण मुलीच्या काळजीने आतल्याआत त्या अस्वस्थ होत होत्या. काही दिवसांनी पुन्हा सगळं सुरळीत झालं. जवळ जवळ २-३ महिने सगळंच व्यवस्थित चाललं होतं. आता सर्वांची चिंता कमी झाली होती , आणि एक दिवस इशिकाच्या आयुष्यात “अर्णव” आला. तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा, विश्वास ठेवणारा, तिला समजून घेणारा. त्याचं तिच्या आयुष्यात येणंही चमत्कारीकच होतं पण ते जे काहि होतं त्या इशिका खुप खुश होती. गेल्या काही महिन्यात जे काहि तिच्या बाबतीत घडलं त्यातून ती ब-यापैकी सावरली होती. थोड्याच दिवसात दोघांनी संपुर्ण आयुष्यभराची स्वप्न पाहिली होती. पण त्या स्वप्नांनाही अशी नजर लागेल याचा तिने स्वप्नातही विचार केला न्हवता.

आता गेल्या १ महिन्यांपासून इशिका हॉस्पिटलमधे होती. अन् ते हॉस्पिटल होतं “सर्वोदय मनोरूग्नालय” डॉ. दिपाली व त्यांचे सहकारी डॉ. विकास यांच्या मार्गदर्शनाखाली इशिकाची ट्रीटमेंट सुरू होती. या दरम्यान त्यांनी तिच्या घरच्यांकडून बरीच माहिती घेतली होती. आता डॉ. दिपाली, डॉ.विकास यांच्या समोर इशिकाचे आई-बाबा व भाऊ बसलेले होते. “डॉक्टर नक्की काय झालंय आमच्या मुलीला….. काही भूतबाधेचा प्रकार नाही ना हो…..” इशिकाची आई अगतिकतेने बोलत होती. “हे बघा मॅम तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये ….. इशिकाच्या बाबतीत जे काही घडलं , तो सगळा एका भासाच्या मानसिक रोगाचा प्रकार आहे…याला आमच्या मेडीकल भाषेत “स्किझोफ्रेनिया” म्हणतो.” डॉ. विकास म्हणाले. “काय?!!” तिचे बाबा आश्चर्यचकित झाले. “हो… या आजारात पेशंटला सतत भास होत रहातात, वेगवेगळे आवाज ऐकू येतात, त्यांच्या आसपास सतस कुणातरी वावरतं असं त्यांना वाटतं, काही काळाने हे पेशंट स्वतःचंच असं एक काल्पनिक विश्व तयार करतात व त्यातच वावरतात….इशिकाच्या बाबतीतही बहूदा असंच काहीतरी झालं असण्याची दाट शक्यता आहे.” डॉ. दिपाली यांनी माहिती सांगितली. “पण हे कसं शक्य आहे डॉक्टर, इशिका आम्हा सर्वांसोबत नेहमीच नॉर्मल वागत आलीय.. म्हणजे आम्हाला तसं काही..कधी..जाणवलंच नाही हो… फक्त त्या काही घटना सोडल्या तर….हल्ली फक्त ती जास्त एकलकोंडी झाली होती….आणि हा अर्णव जो कुणी आहे त्याच्याबद्दल तर आम्हाला काहीच माहित न्हवतं ” तिचे बाबा म्हणाले. “ok …. तुमचं म्हणणं बरोबर आहे मि. शेलार….कारण इशिका अजून त्या स्टेजला पोहोचलेली नाहिये” डॉ. विकास म्हणाले. “पण हे सगळं कसं काय झालं डॉक्टर?…आम्ही तर खुप जपतो हो तिला..” इशिकाची आई म्हणाली. “हम्म… ok मि. & मिसेस शेलार आता मी जे काही सांगतेय ते नीट आणि लक्षपुर्वक ऐका… इशिकाच्या बाबतीत या गोष्टींची खरी सुरवात झाली ती तिच्या लाडक्या आज्जीच्या मृत्यूने…. तुम्ही सांगितल्याप्रमाणे इशिका तिच्या आज्जीची खुप लाडकी होती…. त्यामुळे सहाजिकच ती खुप तिच्या आज्जीशी imotionally attached होती… आणि म्हणूनच जेव्हा तिच्या डोळ्यांसमोर तिच्या लाडक्या आज्जीचा accident झाला …तो धक्का ती सहजासहजी सहन करू शकली नाही…..त्या लहान वयात ते तिला पचवनं हि कठीण होतं..त्यामुळे ती स्वतःला असुरक्षित वाटून घेऊ लागली… त्यानंतर तिने स्वतःला एकटं करून घेतलं… ज्यामुळे तिच्या मानातल्या त्या असुरक्षिततेच्या भावनेला आणखी खतपाणी मिळालं…. हळूहळू तिने पुस्तकांना आपले मित्र बनवलं पण त्यातही तिला भयानक कथा वाचण्याचा छंद असल्याने त्यातली एक एक भिती तिच्या मनात रूजत गेली…. पुढे त्याचंच पर्यावसन तिला होणा-या या अमानवीय वाटणा-या भासांमधे झालं….. आणि …..”अर्णव”चं म्हणाल तर…….”

“तर ..काय… डॉक्टर?” इशिकाच्या भावाने विचारलं “हो ..सांगते..”अर्णव”चं म्हणाल तर……. तिला भेटलेला हा तिचा प्रियकर… “अर्णव” हाही एक भासंच होता…..” डॉ.दिपाली म्हणाल्या “काय!!!…हे कसं शक्य आहे डॉक्टर? ” तिचे बाबा आश्च्याने म्हणाले. “कारण तुमच्याकडे चौकशी करतानाच मी तिच्या मैत्रिणीला म्हणजे सुमनलाही भेटले व तिच्याशी बोलले एवढंच नाहीतर मी इशिकाशीही संवाद साधला …. खुद्द इशिकाच्या मोबाईलमधले फोटोज पाहिले, जे तिच्या म्हणण्यानुसार तिने अर्णव बरोबर काढले होते… पण जेव्हा तेच फोटोज आम्ही पाहिले तर त्यात फक्त आणि फक्त इशिकाच होती…त्यातूनच मला अशी शंका आली कि इथे कुठेतरी काहीतरी गडबड आहे …कारण तिने मला हे सांगितलं कि “अर्णव” तिच्याबरोबर असतो मात्र कुठून येतो?..कुठे जातो? …इतकंच काय तर त्याच्याबद्दल व तो कुठे रहातो हेही तिला माहित न्हवतं….मग मी तिने वर्णन केलेल्या details नुसार त्याचं स्केच बनवून घेतलं….. हे पहा हे ते बनवलेलं स्केच.” डॉ. दिपालींनी एक स्केच इशिकाच्या आई-वडीलांसमोर ठेवलं,”आता तुम्ही सांगा या व्यक्तीला तुम्ही कधी पाहिलंत का? ” “नाही हो…आम्हीही याला आत्ताच बघतोय” तिची आई म्हणाली. “त्या भयानक गोष्टींच कळलं पण हा “अर्णव”? … त्याचा भास कसा काय आणि त्याचं accident तिच कशी काय कल्पू शकते?” तिचे बाबा म्हणाले.

“सांगते…..हि काही इशिकाच्या वाचनातील पुस्तकं पहा जी मला तुम्हीच आणून दिली होती… यातली काही पुस्तकं हि भयकथेची आहेत…. इशिकाच्या बाबतीत घडलेल्या घटना काहिश्या या पुस्तकांतील कथांशी साधर्म्य साधणा-या आहेत….. ” डॉ. दिपालींनी काही पुस्तकं इशिकाच्या आई-बाबांसमोर ठेवली, “आणि हे एक पुस्तक…. ह्यात भयकथा नाही पण एक प्रेमकथा आहे…. ह्या कथेच्याच माध्यमातूनच तिच्या मनातील जोडीदार म्हणजेच “अर्णव”चा तिच्या आयुष्यात प्रवेश झाला…. पण एका वळणावर मात्र तिच्या मनातील तिच्या आज्जीच्या आठवणी नकळत तिच्या आयुष्यात डोकावल्या याची तिला कल्पनाही न्हवती…. ज्याप्रमाणे तिची आज्जी तिच्या मनाच्या खुप जवळ होती, त्याचप्रमाणे “अर्णव”ही तिच्या मनाच्या खुप जवळ आला होता…. पण ज्याप्रमाणे एकाएकी तिची आज्जी एका भीषण अपघातात तिला सोडून गेली अगदी तसाच अपघात तिने “अर्णवच्या बाबतीतही पाहिला…आणि नेमकी हाच धक्का ती सहन करू शकली नाही…कारण हा तिच्यासाठी दुसरा मोठा मानसिक धक्का होता व त्यामुळेच ती या अवस्थेत पोहोचली. “डॉक्टर!! आता पुढे काय करायचं ठरवलंय तुम्ही? …आम्हाला आमची इशु परत हवीय…” “घाबरू नका … इशिका नक्की बरी होईल यातून पण ह्यासाठी आपल्याला तिला तिच्या या आभासी जगातून बाहेर काढावं लागेल.” डॉ. विकास म्हणाले. “पण ते कसं करणार डॉक्टर?” तिचा भाऊ म्हणाला. “आता जे काही सत्य मी तुम्हाला सांगितलं तेच सत्य तिलाही पटवून द्यायचं …. हे जरा कठीण आहे पण अशक्य नाही…. यात आम्हाला तुम्हा सर्वांची मदत लागेल…. तिच्या मनातली भिती, असुरक्षितपणाची भावना आपल्याला पूर्णपणे काढून टाकायची आहे…आणि जेव्हा हे शक्य होईल तेव्हाच इशु ख-या अर्थाने बरी होईल” डॉ. दिपाली इशिकाच्या कुटुंबीयांना धीर देत म्हणाल्या. ठरलेल्या उपचार पद्धतीने डॉ. दिपाली व डॉ. विकास यांनी इशिकाला हळूहळू विश्वासात घ्यायला सुरवात केली.. यात तिच्या घरच्यांनीही तिला धीर दिला… मग हळूहळू एक एक गोष्टी तिच्यासमोर उलगडल्या गेल्या , त्यावेळी इशिकाला मात्र एकामागोमाग धक्क्यांवर धक्के मिळत होते व तिला काही वेळेस ते सहन करणंही असह्य होत होतं त्यावेळेस डॉक्टर तिच्याशी बोलणं बंद करत असत. पण जेव्हा “अर्णव”चा विषय निघाला तेव्हा इशिकाच्या डोळ्यातले अश्रू सतत वहात होते…. त्याच्या आठवणींनी ती आणखीनच व्याकूळ झाली, पण डॉक्टरांनी तिनेच काढलेले फोटोज तिला दाखवून सत्य पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला… काही दिवसांनंतर त्यांना त्यात यशही आलं अश्या प्रकारे जवळ जवळ १वर्षापर्यंत तिच्यावर उपचार सुरू होते.

१ वर्षानंतर….
इशिका हॉस्पिटलमधे तिच्या रूमच्या खिडकीत उभी राहून समोरच्या समुद्राकडे पहात उभी होती..सगळ्या गोष्टींचा नीट उलगडा झाल्यानंतर इशिकाला विचार करू लागली, तिला नेहमी प्रश्न पडायचा कि “अर्णवबरोबर असताना लोक तिच्याकडे विचित्र नजरेने का पहायचे?, कारण तेव्हा “तो” तेव्हा तिच्याबरोबर नसायचाच त्याचं असणं हा फक्त केवळ तिचा आभास होता. तरीही त्यात तिने सुख अनुभवलं होतं… असा विचार करता करता त्याच्या आठवणीने पुन्हा एकदा तिचे डोळे पाणावले.. पण ..आज तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता.. १ वर्षानंतर इशु बाहेरच्या जगात मोकळा श्वास घेणार होती. “इशु!!!” हाक ऐकून इशिकाची तंद्री भंग पावली व तिने मागे वळून पाहिलं. रूमच्या दरवाज्यात तिचे बाबा, त्यांच्या पाठोपाठ तिचा भाऊ, आई व तिची मैत्रिण सुमनही होती. सर्वांना एकत्र पाहू तिला फार आनंद झाला. “बाबा!! आई!!… दादा … सुमन तुम्ही सर्व!!.. केव्हा आलात? ” तिने आनंदी होऊन विचारलं . सुमनला तर पहाताच इशिकाने तिला मिठी मारली व दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, या १ वर्षात आई-बाबा, भाऊ तर भेटायचेच पण सुमन मात्र भेटू शकली न्हवती कारण आपल्या लाडक्या मैत्रिणीला ती या अवस्थेत तिला बघवणारं न्हवतं पण आज ती मुद्दाम इशिकाला भेटायला आली होती. “इशु …बाळा.. कसला विचार करत होतीस गं खिडकीत उभी राहून?” तिच्या बाबांनी विचारले. इशिकाने त्यांच्याकडे पाहिलं व गंभीर होत म्हणाली ” बाबा मला बाहेर एक बाई तिच्याकडे बोलावत होती..” हे ऐकताच काही क्षण सर्वांच्या चेह-याचा रंग उडाला व सर्व आश्चर्यायाने तिच्याकडे पाहू लागले. त्यांचे ते चेहरे बघू एकाएकी इशिकाला हसू फुटलं व ती मनमोकळीे हसू लागली. ते पाहून सर्वजण आणखीनच भांबावले. “घाबरलात ना सगळे?….. अरे मी मुद्दाम म्हणाले…. फिरकी घेतली सर्वांची … फसलात ना सगळे?” आणि इशिका पुन्हा जोरजोरात हसू लागली. “इशु … तू तर धस्संच केलंस बघ काळजात आमच्या ” तिची आई तिच्या जवळ येत म्हणाली. “आमचं बाळ जोकही करायाला शिकलं की” तिचे बाबा म्हणाले. “तू चल घरी … मग बघ कशी तुझी फिरकी घेतो ती ” तिचा भाऊ म्हणाला. “आई-बाबा, दादा…. तुम्ही सर्वजण खरंच माझी काळजी करू नका आता …. बरी झालेय मी आता … I’m ok now…” इशिका म्हणाली. मग तिच्या आईने तिचं सामान आवरायला मदत केली व तिची बॅग हातात घेऊन तिचा भाऊ बाहेर पडला. काही वेळातच तिचे बाबा डॉक्टरांच्या केबीनमधे होते. “डॉक्टर … तुमच्या प्रयत्नांमुळेच आज आमची मुलगी बरी झालीय… नाहीतर तिच्या बाबतीत घडलेल्या घटनांमुळे आम्ही तर आशाच सोडून दिली होती.” इशिकाचे वडिल म्हणाले. “हे बघा … आम्ही जे काही केलं ते आमचं कर्तव्यच होतं… पण आम्हाला तुम्हीही मदत केलीच की… आणि तसही इशिकाची अवस्था एवढीही वाईट न्हवती कि तिच्यावर उपचार करणं कठीण व्हावं” डॉ. विकास म्हणाले. “इशिका आता पुर्णपणे बरी झालीय… तरीही काही प्रॉब्लेम असेल तर प्लिज तिला घेऊन या… तसं इशिकाशी बोलल्यानंतर समजूदार वाटली… गोड मुलगी आहे ती.” डॉ. दिपाली हसून म्हणाल्या. इशिका हॉस्पिटलच्या गेटबाहेर पडली, तिचा भाऊ टॅक्सी शोधण्यासाठी पुढे गेला. आई-बाबा पुढे व इशिका त्यांच्या मागोमाग सुमनबरोबर चालत होती. “इशु!! ” आवाज कानावर पडताच इशिकाने मागे वळून पाहिलं.अर्णव तिच्याकडे प्रेमाने पाहून हसत होता. इशिका काही क्षण त्याच्याकडे पहातच राहिली, त्याला पाहून नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू झरले. ते पहाताच अर्णवने तिला हातानेच नाही असं सांगितलं, इशिकाने हळूच डोळे पुसले व हसली. अर्णवही हसला, तिला हात दाखवून बाय करत हवेत विरून गेला तसं डोळे पुसत इशिकाने मान फिरवली. “इशु.. काय झालं गं ” सुमनने विचारलं. “काही नाही गं असंच..चल… निघूयात” इशिका म्हणाली, व दोघी पुढे चालू लागल्या.
*** समाप्त ***

Abhas he – marathi horror story, marathi suspense story, marathi love story

You may also like...

28 Responses

 1. Swapnali says:

  Mast aahe story…

 2. Akshay says:

  Generally Story sampetana twist saampto pan tumhi thevlat nice one nice story .

 3. Akshay says:

  generally story samptana twist sampto but u keep alive interesting nice story

 4. Pravin says:

  Bipasha nd jhon chya movie vrun ghetlela aashay

 5. Sudha Mhetre says:

  mala end khoup aavadala……… aasach story lihit rahve…………

 6. Nikhil says:

  That was really amazing story…gosht vachatana angavar shahare yet hote…kharach khup chan

 7. rashmi katawate says:

  mast !

 8. Mana says:

  1 number aahe story

 9. neha mahamuni says:

  very nice story

 10. varsha says:

  I like a story

 11. Kamini vaity says:

  Very good and best of luck

 12. Prashant More says:

  nice one

 13. Bharati says:

  That was really amazing story….. ….Kharach khupach chan

 14. Santosh kamble says:

  Khupach chan….arnav nastana dekhil prem kel ishika ne….its was amazing…..pan ticha kharya ayushyat ekhada arnav yayla ch pahije.

 15. Omi says:

  Awesome story ….plz write more and more horror stories

 16. Raj malhotra says:

  Heart touching

 17. pradeep pawar says:

  Best writing

 18. sagar jadge says:

  nice story end khup chan aahe..

 19. asmi says:

  Really good Yarr and end is most beautiful

 20. minakshi says:

  khoop masta katha

 21. Asmita says:

  khup chan story??

 22. Diksha says:

  Nice story i like it.keep writing

 23. kunjal says:

  its was a very awesome story because all was imaginary somehere relistic to feel and imagine i like it

 24. kunjal says:

  its was a very awesome story because all was imaginary somewhere realistic to feel and imagine i like it

 1. August 20, 2015

  […] आभास हे भाग २ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *